ठळक घडामोडी

हत्ती पकड मोहिमेच्या मागणीसाठीचे ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी मागे!

वनविभागाच्या लेखी आश्वासनानंतर दोडामार्गातील आंदोलन स्थगित

हत्तींचा उच्छाद रोखण्यात अपयश; अखेर वनविभागाने काढला तोडगा

दोडामार्ग : प्रतिनिधी
       हत्ती पकड मोहिम राबविण्यासाठी छेडलेले ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी रात्री उशिरा मागे घेण्यात आले. आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे पाहून वनविभागाने अखेर यावर तोडगा काढला व लवकरच हत्तींना रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे आश्वासनाचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिले. गुरुवारी रात्री उशिरा सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेतले.
       दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या हत्तींना रोखणे, शेतकऱ्यांची होणारे नुकसान टाईम यात वनविभाग सपशेल अपयशी ठरला. मानव व हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने तात्काळ हत्ती बाधित सरपंच व ग्रामस्थांसोबत बैठक लावावी. शिवाय हत्ती पकड केव्हा पर्यंत राबविली जाईल याबाबत लेखी माहिती देण्यात यावी अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी वनविभागाकडे केली होती. मात्र नेहमीप्रमाणे केवळ आश्वासने देऊन पाठ दाखवणाऱ्या वन विभागाने या मागणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.
       येथील वन कार्यालयात सोमवारी सकाळी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यात प्रवीण गवस यांसह दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई, सरपंच अजित देसाई, साक्षी देसाई, हेवाळे माजी उपसरपंच समीर देसाई, तुकाराम बर्डे, दत्ताराम देसाई यांसह अनेकांनी सहभाग घेतला. आंदोलनाचे जसजसे दिवस वाढू लागले तसतसे ते अधिक तीव्र होऊ लागले. दरम्यान आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी आंदोलनकर्त्यांशी केलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.
       ज्याप्रमाणे कर्नाटक राज्याने हत्तींना रोखण्यासाठी लोखंडी बॅरिकेड्स उभारले आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर बॅरिकेड्स उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच हत्तींना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील असे लेखी आश्वासनाचे पत्र वैभव बोराटे यांनी दिले व ठिय्या आंदोलन स्थगित करण्याची विनंती आंदोलनकर्त्यांना केली. त्यामुळे रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

error: Content is protected !!