ठळक घडामोडी

बांदा येथे आगीत होरपळून एकाचा मृत्यू

सावंतवाडी : प्रतिनिधी

   बांदा येथील आरोसबाग परिसरात शेकोटी घेत असताना अचानक लागलेल्या आगीत होरपळून अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६५) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास घडली.

    उपलब्ध माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. याच थंडीपासून बचाव करण्यासाठी अविनाश चांदेकर हे आज पहाटे आपल्या घराजवळ शेकोटी पेटवून ऊब घेत होते. मात्र, शेकोटी घेत असताना अचानक आगीचा भडका उडाला. ही आग इतकी भीषण होती की, चांदेकर यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि ते गंभीररीत्या होरपळले गेले. परिसरातील नागरिकांनी आग लागल्याचे लक्षात येताच मदतीसाठी धाव घेतली, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत चांदेकर यांचा मृत्यू झाला होता.

   अविनाश चांदेकर हे बांदा येथील श्री स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेत शिपाई पदावर कार्यरत होते. काही वर्षांपूर्वीच ते या संस्थेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मृदू आणि मनमिळावू स्वभावामुळे परिसरात ते परिचयाचे होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण आरोसबाग आणि बांदा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. ही आग नेमकी कशी भडकली, याचा अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!