जि.प.च्या ५० जागांसाठी २७३ तर पं.स.च्या १०० जागांसाठी ४४० अर्ज दाखल
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. तालुकानिहाय पाहता जिल्हा परिषदेच्या ५० गटांसाठी एकूण २७३ तर पंचायत समितींच्या १०० गणांसाठी ४४० उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात एकूण ५० जिल्हा परिषद गट व १०० पंचायत समिती गण असून अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. काही ठिकाणी बंडखोरीही उघडपणे समोर आली आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक अर्ज दाखल झाले असून येथे ९ जिल्हा परिषद गटांसाठी तब्बल ६० तर १८ पंचायत समिती गणांसाठी १०१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. कुडाळ तालुक्यात ९ जिल्हा परिषद गटांसाठी ४८ तर १८ पंचायत समिती गणांसाठी ६४ अर्ज दाखल झाले आहेत. कणकवली तालुक्यात ८ जिल्हा परिषद गटांसाठी ३७ तर १६ पंचायत समिती गणांसाठी ६० अर्ज प्राप्त झाले आहेत. वेंगुर्ले तालुक्यात ५ गटांसाठी ३७ तर १० गणांसाठी ६२ अर्ज दाखल झाले आहेत. मालवण तालुक्यात ६ गटांसाठी २८ तर १२ गणांसाठी ५३ अर्ज दाखल झाले आहेत. देवगड तालुक्यात ७ जिल्हा परिषद गटांसाठी २७ तर १४ पंचायत समिती गणांसाठी ३७ अर्ज प्राप्त झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यात ३ गटांसाठी २१ तर ६ गणांसाठी ३६ अर्ज दाखल झाले आहेत. वैभववाडी तालुक्यात ३ जिल्हा परिषद गटांसाठी १५ तर ६ पंचायत समिती गणांसाठी २७ अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूणच जिल्ह्यातील अनेक गट व गणांमध्ये उमेदवारांची संख्या मोठी असल्याने निवडणूक चुरशीची होणार असून उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर नेमकी लढत कोणाकोणात होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माघारी आणि अंतिम उमेदवार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









