औषध कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा; क्रिकेट स्पर्धेत कुडाळचा ऐतिहासिक विजय
कुडाळ येथे औषध कर्मचारी संघटनेचा स्नेहमेळावा; औषध कर्मचारी–व्यावसायिकांची मोठी उपस्थिती
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहमेळावा कुडाळ येथे नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कुडाळ तालुका औषध कर्मचारी संघटनेचे सहकार्य लाभले.
या स्नेहमेळाव्यास सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, ज्येष्ठ कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच कुडाळ तालुक्यातील औषध व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले. यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच कुडाळ तालुक्याच्या संघाने सहा वर्षांपासून विजेतेपद पटकावणाऱ्या कणकवली संघाला नमवून अंतिम सामना जिंकत इतिहास घडविला. विजेत्या संघाचे उपस्थित मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले. या स्नेहमेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन कुडाळ औषध कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण घाडी यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक गोवेरकर यांनी मानले.









