तन्मय वालावलकरांच्या पाठपुरावा; खड्डे बुजविण्याचे काम सुरू
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त वाहनधारकांना मिळणार दिलासा
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – पिंगुळी – मठ मार्गे वेंगुर्ले या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला पिंगुळी मधून आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत भाजपा युवा मोर्चाचे कुडाळ मंडल अध्यक्ष तन्मय वालावलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता. प्रत्यक्षात खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात झाल्याने वाहनधारक, नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारक, नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, याबाबत वाहनधारक व नागरिकांतून रस्ता दुरूस्तीची मागणी होत होती. याबाबत भाजपा युवा मोर्चाचे कुडाळ मंडल अध्यक्ष तन्मय वालावलकर यांनी सा.बां.विभागाचे लक्ष वेधून रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आजपासून प्रत्यक्षात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपल्या पाठपुराव्याला यश आल्याची माहीती तन्मय वालावलकर यांनी दिली.









