न.पं.चा निर्णय; मोकाट गुरांमुळे वाहतूकीस अडथळे व अपघात
गुरे न नेल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा – न.पं.प्रशासन
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहर व शहरालगतच्या परिसरात मोकाट मोकाट गुरे फिरत असल्याने वाहतुकीस अडथळे, अपघात तसेच नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतीमार्फत गुरूवार दि. २२ जानेवारी २०२६ पासून शहरात मोकाट गुरे पकडण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती न.पं.प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
कोंडवाडा अधिनियमानुसार पकडण्यात येणाऱ्या मोकाट गाई-गुरांना सरसोलीधाम येथील गोशाळेत ठेवण्यात येणार आहे. सदर गुरे पकडल्यानंतर गोशाळा शुल्क तसेच देखभालीसाठी होणारा संपूर्ण खर्च संबंधित गुरांच्या मालकांकडून वसूल करण्यात येणार आहे. तसेच, संबंधित मालकांनी विहित मुदतीत आपली गुरे ताब्यात न घेतल्यास नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९८५ मधील तरतुदीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आला आहे.







