महायुती ही विकास व विश्वासाची युती; विरोधक स्वेच्छेने आमच्याकडे येत आहेत
जि.प.- पं.स.च्या सर्व जागा जिंकण्याचा महायुतीचा संकल्प; आमदार निलेश राणे
कुडाळ : प्रतिनिधी
उबाठा सेनेकडे आज सक्षम नेतृत्व नाही तसेच तळागाळात काम करणारे उमेदवारही उरलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांवर जबरदस्तीने उमेदवारी लादली जात असून, याच कारणामुळे त्यांच्या गटातील उमेदवार व कार्यकर्ते अर्ज मागे घेत आहेत. ही परिस्थिती म्हणजे उबाठा गटाच्या अपयशाची कबुलीच आहे, अशी जोरदार टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे माध्यमांशी बोलताना केली.
आ. राणे म्हणाले की, महायुती ही केवळ निवडणुकीपुरती नसून विकासाची आणि विश्वासाची युती आहे. मागील काही वर्षांत राबवलेल्या विकासकामांमुळे जनतेचा आमच्यावर विश्वास वाढला असून, त्यामुळे विरोधकांचे अनेक कार्यकर्ते व उमेदवार कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने महायुतीकडे येत आहेत. कोकणातील राजकीय वातावरण महायुतीच्या बाजूने असून, काही ठिकाणी जागा बिनविरोध निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनतेला विकास हवा आहे, राजकीय गोंधळ नको, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कामगिरीचा उल्लेख करताना आ. निलेश राणे म्हणाले की, मागील २७ वर्षांपासून खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त राहिला आहे. पुढील काळात जिल्ह्यासाठी अधिकाधिक निधी आणून जिल्हा परिषदेचा टर्नओव्हर किमान २५ टक्क्यांनी वाढवण्याचा आमचा निर्धार आहे. महायुतीमध्ये कोणतीही कुरबूर नसून, सर्व नेते आणि कार्यकर्ते कुटुंबाप्रमाणे एकत्र काम करत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्व जागा जिंकण्याचा संकल्प करण्यात आला असून हा संकल्प आम्ही निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









