ठळक घडामोडी

कर्ज वसुलीच्या नोटीसांमुळे शेतकरी वेठीस!

जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष

कुडाळ : प्रतिनिधी
      विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा बजावून वेठीस धरले जात आहे. याबाबत आपण लक्ष घालून संबंधित संस्थेस शेतकऱ्यांना वेटीस धरून त्रास न देणेबाबत सूचना द्यावी, अशी मागणी नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य रुपेश पावसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा निबंधक, सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
       सध्या शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली असून त्याबाबत प्रत्येक संस्था/बँक यांचेकडून शेती कर्जाविषयी माहिती संकलित करण्याचे काम सुरू केलेले आहे.शेतकऱ्यांना वित्तीय संस्था या शेती कर्ज व छोट्या शेती कर्जासाठी खावटी कर्ज देत असताना खावटी कर्ज हे सुद्धा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था देत असतात. त्यामुळे खावटी कर्ज ही शेती कर्जात गणले जाते. असे असता कुडाळ तालुक्यातील एका विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने तेथील शेतकरी कर्जदारांना कर्ज वसुलीच्या नोटीचा बजावल्या असून कायदा कलम १०१ खाली कारवाई करण्याचे कळवून शेतकऱ्यांना वेटीस धरलेले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. तरी सदर प्रकरणी आपण लक्ष घालून संबंधित संस्थेस शेतकऱ्यांना वेटीस धरून त्रास न देणेबाबत सूचना द्यावी, अशी मागणी श्री.पावसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह सहकारी संस्था जिल्हा निबंधकांकडे केली आहे.

error: Content is protected !!