कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माणगाव तिठा येथील महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स या दुकानाला शुक्रवारी रात्री अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, साळगाव येथील प्रसाद साउळ यांच्या मालकीचे हे दुकान माणगाव तिठा येथील झाराप रस्त्यालगत आहे. शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास साउळ यांनी दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर दुकानाच्या शेजारी असलेल्या हॉटेलचे मालक विश्वास मुंज यांच्या निदर्शनास दुकानातून धूर येत असल्याचे आले. मुंज यांनी तत्काळ प्रसाद साउळ यांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर साउळ तातडीने दुकानाकडे आले. त्यांनी दुकान उघडून पाहिले असता दुकानातील इलेक्ट्रिकल साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.









