ठळक घडामोडी

अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान – आमदार निलेश राणे

कुडाळ : प्रतिनिधी
     राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून न निघणारी आहे, अशा शब्दांत कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
      आज सकाळी अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच ती अत्यंत धक्कादायक असून अजूनही विश्वास बसत नाही की अजित दादा आपल्यात नाहीत, अशी भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली. त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, २००९ साली मी पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो, त्या वेळी माझ्यासोबत प्रचारासाठी येणारे पहिले नेते अजित दादा पवार होते. त्या काळापासून त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. आमदार झाल्यानंतरसुद्धा विधानसभेत एका नव्या आमदाराला कुठेही अडचण येऊ नये यासाठी अजित दादांच्या विभागाचे माझ्यावर विशेष लक्ष असायचे. अनेक गोष्टी न मागताही ते मला देत असत. असा दिलदार, मनमोकळा आणि संवेदनशील नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून अचानक निघून जाणे ही राज्यासाठी मोठी हानी असल्याचे निलेश राणे यांनी नमूद केले. अजित पवार यांची सभागृहातील शिस्त, कामकाजाची पद्धत आणि निर्णयक्षमता ही कायमच प्रेरणादायी होती. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले आणि अजूनही बरेच काही शिकायचे होते, पण अजितदादा आपल्यातून निघून गेले. अजित पवार यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत आमदार निलेश राणे यांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली.

error: Content is protected !!