ठळक घडामोडी

कारणं नकोत… निकाल हवा… आ.निलेश राणे यांचा प्रशासनाला सूचक इशारा!

कुडाळ मध्ये‘नमो उद्यान’चे भूमिपूजन

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ शहरातील ‘नमो उद्यान’ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी जाहीर मंचावरूनच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत विकासकामांबाबत स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडली. तिसरा-दुसरा नाही… आपल्याला पहिलाच क्रमांक हवा आणि पाच कोटींचं बक्षीसही कुडाळचं असलं पाहिजे, असे ठणकावत त्यांनी कामात कोणतीही सबब चालणार नसल्याचा इशारा दिला.
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘नमो उद्यान’ उपक्रमांतर्गत कुडाळ सांगिर्डेवाडी येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन आज पार पडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेला स्थानिक पातळीवर गती देताना राज्य शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे.
       यावेळी बोलताना आ. राणे म्हणाले, मला कारणं ऐकण्याची सवय नाही. काम करा,तेही दर्जेदार करा. कुडाळ नगरपंचायतीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आलेल्या निधीचा योग्य वापर झाला पाहिजे आणि कामातून परिणाम दिसला पाहिजे. त्यांच्या या थेट शब्दांनी उपस्थित पदाधिकारी अक्षरशः गार पडले.पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प कुडाळात साकारत असल्याचे त्यांनी नमूद करत पुढील विकास आराखड्याचेही संकेत दिले. मच्छिंद्र सभागृहासाठी १५ कोटी आणि नगरपंचायत इमारतीसाठी ५ कोटींचा निधी मिळत आहे. कुडाळला २१व्या शतकातील आधुनिक शहर बनवायचं असेल, तर गती आणि गुणवत्ता दोन्ही दाखवावी लागेल,लोकांनी दिलेला विश्वास टिकवायचा असेल, तर कामातून सिद्ध करा. ही खुर्ची म्हणजे मंदिर आहे तिचा मान ठेवा. हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही.विरोधकांनाही सोबत घेऊन काम करण्याचा सल्ला देताना त्यांनी सूचक इशारा दिला,तक्रारी येऊ देऊ नका. नाहीतर संधीसाठी बाहेर मोठी रांग असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
        या कार्यक्रमास नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, जि.प.सदस्या दिपलक्ष्मी पडते, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, संजय पडते, काका कुडाळकर, संजय वेगुर्लेकर, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, निलेश परब, ऍड. राजिव कुडाळकर, उदय मांजरेकर, संध्या तेरसे, गणेश भोगटे, अक्षता खटावकर, आफरीन करोल, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, चांदणी कांबळी तसेच मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.प्रास्ताविक विनायक औंधकर यांनी केले, सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पाटील यांनी मानले.

error: Content is protected !!