
तुळसुली येथील हिंदु राष्ट्रजागृती समिती सभेत प्रतिपादन
कुडाळ : प्रतिनिधी
हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य हे सत्-असत् व धर्म-अधर्म यातील दैवी लढा असून, या कार्यात सैनिक म्हणून सहभागी होणाऱ्यांचे कल्याण निश्चित होईल. त्यामुळे कल्याणकारी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाने आपला किमान एक तास देण्याचा निर्धार करूया, असे प्रतिपादन अधिवक्ता सौ. कावेरी राणे यांनी केले.
कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथील श्री लिंगेश्वर विद्यालयात राष्ट्र रविवारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत त्या बोलत होत्या. सभेची सुरुवात सद्गुरू श्री सत्यवान कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
अधिवक्ता राणे म्हणाल्या की, हिंदू धर्म हा प्रत्येक जिवाच्या संरक्षणाची खात्री देतो. मात्र आज हिंदू धर्मासमोर लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतरण व सांस्कृतिक जिहाद यासारखी आक्रमणे उभी आहेत. या संकटांवर मात करण्यासाठी स्वधर्मावर प्रेम, धर्माचरण व धर्मशिक्षण आवश्यक आहे. मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे असून ती बंद पडू देऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज देश-विदेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायकारक घटनांमागे हिंदू समाजाची संघटनशक्ती कमी होत चालल्याचे कारण आहे. येणारा काळ प्रतिकूल असला तरी साधना, उपासना आणि संघटनाच्या बळावरच हिंदू समाज सुरक्षित राहू शकतो, असे त्यांनी सांगितले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून धर्मकार्याशी जोडले जावे, असे आवाहनही त्यांनी केले.








