अधिकारी-कर्मचारीच जास्त; प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव उघड
प्रशासनाची धावाधाव; डॉ. घाडीगांवकरांचे ‘दुग्ध व्यवसाय’वर मार्गदर्शन
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या सिंधुसरस प्रदर्शनांतर्गत रविवारी आयोजित पशुसंवर्धन व कृषी विभागाच्या शेतकरी व पशुपालक मेळाव्याला शेतकऱ्यांची अल्प उपस्थिती पाहायला मिळाली. मेळाव्यात शेतकऱ्यांपेक्षा शासकीय अधिकारी व कर्मचारीच अधिक उपस्थित असल्याचे चित्र दिसले. शेवटी प्रशासनाने धावाधाव करीत बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन ऐकण्यासाठी बसवावे लागल्याने प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव प्रकर्षाने दिसून आला.
‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज झालेल्या या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती ठेवण्याची जबाबदारी संबंधितांवर सोपविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात उपस्थिती अत्यल्प राहिल्याने आयोजकांनीही नाराजी व्यक्त केली. मेळावा संपल्यानंतर उपस्थितीबाबत आढावा घेण्याचा इशाराही देण्यात आला.
या मेळाव्यात कुडाळचे सुपुत्र डॉ. मंगेश घाडीगांवकर यांनी ‘किफायतशीर दुग्ध व्यवसाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनीही शेतकऱ्यांच्या अल्प उपस्थितीबाबत खंत व्यक्त करत, जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला मोठा वाव असूनही त्याकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे नमूद केले.
दुग्ध व्यवसाय हा कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा असून तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. व्यावसायिक दृष्टिकोनातून दुग्ध व्यवसाय केल्यास मोठे अर्थार्जन शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









