अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर – अभिनेता पृथ्वीक प्रताप यांच्या भेटीने आंदुर्ले गावात विकासाचा उत्सव
कुडाळ : प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज (रविवारी) कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावाला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्विक प्रताप व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी भेट दिली. यावेळी आंदुर्ले गावातील ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात ढोलताशांच्या गजरात या सेलिब्रिटींचे स्वागत केले.
यावेळी सिंधुदुर्ग जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर हे उपस्थित होते. श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समिती यांच्या माध्यमातून आंदुर्ले ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या प्लास्टिक क्रशरमशीनचे सेलिब्रिटींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
ग्रामपंचायत सुसज्ज व्यायामशाळा व सभागृहातील बचत गटांचे स्टॉल,पेशंट बॅंक,बर्तन बॅंक,शवपेटी अशा लोकसहभागातून झालेल्या विविध उपक्रमांची पहाणी केली. आंदुर्ले ग्रामपंचायत सभागृहात काढण्यात आलेली सेलिब्रिटींची पोर्ट्रेट रांगोळी लक्षवेधी ठरली. दशावतार कलाकारांनी केलेले स्वागत व आंदुर्ले-मुणगी महसूल गावातील बचत गटांचे केरसुणी बनवणे या व्यवसायाची सेलिब्रिटी व मान्यवरांनी प्रशंसा केली. आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व हा दिवस आंदुर्ले गावच्या व ग्रामस्थांच्या मेहनतीचे फळ आहे असे सांगितले. यावेळी माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, उपसरपंच अनिल भगत, ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा पेडणेकर, माजी सरपंच आरती पाटील, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकीसन मोर्ये,अंजनी पाटकर, स्मिता पिंगुळकर,अनुराधा साळगांवकर, सुप्रिया येरम, प्रसाद सर्वेकर, सतिश राऊळ, सर्व शासकीय कर्मचारी व ग्रामसंघ पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.









