पिंगुळी जि.प.–पं.स. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेची आघाडी; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाढता प्रतिसाद, आमचा विजय निश्चित – गंगाराम सडवेलकर यांचा विश्वास
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून, या मतदारसंघात ठाकरे शिवसेनेने प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर व पंचायत समिती उमेदवार ममता राऊळ यांनी आज सकाळी पिंगुळी गावात भव्य प्रचारफेरीला सुरुवात केली. या प्रचारफेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या तसेच ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. वाढता जनसमर्थन पाहता आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास गंगाराम सडवेलकर व ममता राऊळ यांनी व्यक्त केला.
पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे शिवसेना पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरली असून, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पिंगुळी पंचायत समिती मतदारसंघातून ममता राऊळ तर साळगाव पंचायत समिती मतदारसंघातून तालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तीनही उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने मैदानात उतरले असून, ग्रामस्थही प्रचारफेरीत सक्रिय सहभाग घेत आहेत. गंगाराम सडवेलकर यांनी यापूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून या भागाचे नेतृत्व केले असून, सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या मजबूत जनसंपर्काचा लाभ प्रचारात होत असल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात प्रचाराचा झंझावात सुरू असून, ग्रामस्थ व मतदारांचा वाढता प्रतिसाद आमच्या बाजूने मिळत असल्यामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास गंगाराम सडवेलकर यांच्यासह कृष्णा धुरी व ममता राऊळ यांनी व्यक्त केला आहे.









