ग्रामपंचायत व शुभम परब मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर
रक्तदानासोबत आयुष्यमान कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथे ग्रामपंचायत रानबांबुळी व शुभम परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.
ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन सरपंच परशुराम परब व शुभम परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा रक्तपेढीचे डॉ. स्वप्नील चव्हाण, सुमंगल लुगडे, भूषण मळेकर, मयुरी शिंदे, अन्य डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, कसालचे सरपंच राजन परब, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरादरम्यान आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून अनेक ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून अपघात व उपचारांसाठी रक्ताची मोठी गरज असते, असे प्रतिपादन सरपंच परशुराम परब यांनी केले. रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना जिल्हा रक्तपेढीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.









