मुंबईत वैभव नाईकांचा जोरदार प्रचार; सभा, मशाल रॅली, डोअर-टू-डोअर संपर्क
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत भाजप आणि शिंदे गटाच्या ताब्यात सत्ता गेल्यास महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून मुंबई वाचविण्याची शेवटची संधी प्रत्येक मुंबई वासीयांच्या हातात आहे. या संधीचे सोने करून सत्ताधाऱ्यांच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता भाजप व शिंदे गटाला निवडणुकीतून हद्दपार करा, असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी मुंबईकरांना केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी विविध प्रभागांमध्ये प्रचार सभा, कॉर्नर सभा, मशाल रॅली, प्रचार कार्यालयांना भेटी आणि डोअर-टू-डोअर प्रचार करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. वैभव नाईक म्हणाले की, ५० खोक्यांसाठी आमदार-खासदारांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली असून ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेला भाजपनेही शिक्कामोर्तब केले आहे. भाजप-शिंदे सरकारकडून मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून ठाकरे शिवसेनेच्या २५ वर्षांच्या काळात जमा असलेल्या सुमारे ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्यात आल्या. अदानींना विकण्यासाठीच भाजपला मुंबई हवी असल्याचा आरोप त्यांनी केला.
शनिवार व रविवार या दोन दिवसांत वैभव नाईक यांनी ठाकरे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. प्रभाग क्र.११४ च्या उमेदवार राजुल संजय पाटील यांच्या प्रचार कार्यालयास भेट देऊन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खासदार संजय दिना पाटील, माजी आमदार रमेश कोरगावकर उपस्थित होते. प्रभाग क्र. १२० चे उमेदवार विश्वास तुकाराम शिंदे यांच्या प्रचारानिमित्त काढलेल्या मशाल रॅलीत वैभव नाईक सहभागी झाले. यावेळी आमदार सुनील राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाग क्र.११७ च्या उमेदवार श्वेता राजेश पावसकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित कॉर्नर सभेला वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शवत मार्गदर्शन केले. प्रभाग क्र.११९ चे मनसे पक्षाचे उमेदवार विश्वजित शंकर ढोलम यांच्या प्रचारासाठी खासदार संजय दिना पाटील, आमदार सुनील राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती या प्रचार सभेला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून संबोधित केले. प्रभाग क्र. १३१ च्या उमेदवार वृषाली विशाल चावक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत वैभव नाईक यांनी मार्गदर्शन केले. प्रभाग क्र. १२८ च्या मनसे पक्षाच्या उमेदवार सई सनी शिर्के यांच्या प्रचार कार्यालयास भेट देत विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभव नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रभाग क्र. ८० च्या उमेदवार एकता विनोद चौधरी, प्रभाग क्र.८७ च्या उमेदवार पूजा विश्वनाथ म्हाडेश्वर व प्रभाग क्र. ७७ च्या उमेदवार शिवानी शैलेश परब यांच्या डोअर टू डोअर प्रचारात वैभव नाईक सहभागी झाले होते.







