मालवण : प्रतिनिधी
मालवण) तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण करत संपूर्ण कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी गेले.
आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा वेग आणि तीव्रता अधिक असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शर्तीचे प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत एमटीडीसी कार्यालयातील संगणक, फर्निचर, कागदपत्रे तसेच अन्य कार्यालयीन यंत्रणा जळून खाक झाल्या. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय लाकडी बोटीच्या प्रतिकृतीच्या स्वरुपात उभारण्यात आले होते. लाकडी बांधकाम असल्यामुळे आगीने झपाट्याने फैलाव घेतला आणि काही वेळातच संपूर्ण इमारत जळून भस्मसात झाली सुदैवाने ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरु असून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरु आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ॲक्वाटिक स्पोर्ट्स (इसदा) च्या प्रभारी व्यवस्थापक दीपिका वस्त यांनी घटनेची पाहणी केली. यावेळी तलाठी ज्ञानेश्वर वायाळ यांनी आगीचा पंचनामा केला. आग विझविण्यासाठी एमटीडीसी चे कर्मचारी तसेच ग्रामस्थ विजय टक्के, सिद्धेश चव्हाण, धनंजय झाड, जितेश वस्त, नितीन कोळंबकर, राहुल करलकर, संदीप मालवणकर, विशाल गोसावी, योगेश देऊलकर, सत्यवान देऊलकर, किशोर आडारकर, कुणाल बापर्डेकर, थॉमसन फर्नांडिस, कमलेश नाईक, अक्षय भगत, सुलक्षण पाटकर, संतोष शेवाळे, देवेंद्र मयेकर, नंदकुमार जोशी, जयवंत सावंत, संतोष झाड, गणेश साळगावकर, राघोबा गोसावी, यांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सहभाग घेतला.









