ठळक घडामोडी

ऑल इंडिया सोलो डान्स स्पर्धेत कुडाळ-पिंगुळीच्या अर्शिन शेखची चमकदार कामगिरी

गोवा येथे झाली सेमीफायनल फेरी; टॉप २५ मध्ये स्थान

कुडाळच्या चिमणी पाखरं डान्स अकॅडमीतर्फे गौरव

कुडाळ : प्रतिनिधी
        गोवा येथील सुप्रसिद्ध अनबीटेबल डान्स अकॅडमी, गोवा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया सोलो डान्स स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-पिंगुळी येथील कन्या कु. अर्शिन शेख हिने उल्लेखनीय यश संपादन करत फायनलपर्यंत मजल मारली आहे.
      या स्पर्धेचे ऑडिशन ऑगस्ट २०२५ मध्ये कुडाळ येथे पार पडले होते. देशभरातील विविध ऑडिशन केंद्रांवरून तब्बल १५०० स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ६२५ स्पर्धकांची सेमीफायनलसाठी निवड करण्यात आली. सेमीफायनल फेरी गोवा येथे पार पडली असून, या फेरीत सुप्रसिद्ध टीव्ही कोरिओग्राफर श्री. राजपूत यांनी परीक्षण करून टॉप २५ नृत्यांगनांची निवड केली. यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड होणारी अर्शिन शेख ही एकमेव नृत्यांगना ठरली, ही विशेष अभिमानाची बाब आहे.
       गोवा येथील रवींद्र भवन – मनोहर पर्रिकर सभागृहात झालेल्या फायनल फेरीत अर्शिनने आपल्या उत्कृष्ट नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी सुप्रसिद्ध टीव्ही जज, कोरिओग्राफर व अभिनेते धर्मेश यांच्या समोर नृत्य सादर करून तिने विशेष दाद मिळवली. लहान वयात इतक्या मोठ्या मंचावर नृत्य सादर करून अर्शिनने मोठी कामगिरी केल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी श्री. धर्मेश यांच्या हस्ते अर्शिन शेख हिला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अर्शिनच्या या यशामध्ये तिचे आई-वडील, नृत्य दिग्दर्शक रवि कुडाळकर, निर्माते उमेश पाटील, सल्लागार सुनील भोगटे, तसेच चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ येथील सर्व नृत्यकलाकार यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

error: Content is protected !!