

६ ते ७ फेब्रुवारीदरम्यान ५४ बसफेऱ्या तात्पुरत्या बंद!
प्रवाशांनी सहकार्य करण्याचे एसटी प्रशासनाचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी कुडाळ एसटी आगाराच्या २३ एसटी बसेस निवडणूक प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या बसेस निवडणूक कामासाठी आरक्षित करण्यात आल्याने कुडाळ एसटी आगारातून सुटणाऱ्या एकूण ५४ बसफेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आल्या आहेत.
शुक्रवार दि. ६ फेब्रुवारीपासून ते शनिवार दि. ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या बसफेऱ्या बंद राहणार असून, यामध्ये लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागातील बसफेऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. या संदर्भात प्रवाशांच्या माहितीसाठी कुडाळ बसस्थानक परिसरात प्रशासनाच्या वतीने सूचना फलक लावण्यात आले आहेत. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी व एसटी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळ एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









