ठळक घडामोडी

सरंबळ हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

कुडाळ : प्रतिनिधी
     ग्रामीण भागातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामीण शाळांमधून मिळणारे संस्कार, मूल्यशिक्षण व शिस्त हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे असतात, असे प्रतिपादन कुडाळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सरंबळ हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात केले.
     सरंबळ ग्रामस्थ समता संघ, मुंबई संचलित सरंबळ इंग्लिश स्कूल (सरंबळ) चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा गौरव करणारा सोहळा म्हणून उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान सरंबळ ग्रामस्थ समता संघाचे शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष सचिन मदने, संस्थेचे पदाधिकारी प्रसाद साटम, सागर परब, जयेंद्र तळेकर, रवींद्र करलकर, शाळेचे मुख्याध्यापक अनिल होळकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा, कला, सांस्कृतिक व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरणाचे वाचन सौ. शिरसाट, सौ. आर्या होळकर व किशोर चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्नेहा शिरसाट यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ.आर्या होळकर यांनी केले.
    यानंतर दुस-या दिवशी झालेल्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सत्राचे अध्यक्षस्थान संस्था सरचिटणीस राजेंद्र परब यांनी भूषविले. या सत्रात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गीत, समूहगायन व इतर सादरीकरणांद्वारे आपली कला व कौशल्ये प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बॅरिस्टर नाथ पै कुडाळ संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, संस्थेचे अध्यक्ष अनिल परब, शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, संस्थेचे सीईओ विवेकानंद बालम, संस्थेचे पदाधिकारी प्रसाद साटम, जयेंद्र तळेकर, रवींद्र करलकर, आशिष हळदणकर, संस्थेचे माजी अध्यक्ष विष्णूजी कदम, माजी सरपंच सौ. मनाली साटम, योगेश नाईक, मांडकुली हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक गिरीश सरवटे, संतोष राणे, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक जयसिंग कदम, पोलीस पाटील दिलीप वराडकर, शिक्षक-पालक-मातापालक संघाचे पदाधिकारी, सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा गुलाबपुष्प, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सहाय्यक शिक्षक किशोर चव्हाण यांनी तयार केलेल्या ‘ज्ञानदीप’ या हस्तलिखिताचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. गाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. हे हस्तलिखित विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीस उपयुक्त ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र परब यांनी आपल्या भाषणात शाळेत उपलब्ध असलेल्या डिजिटल क्लासरूम, ई-लर्निंग लॅब, स्मार्ट टीव्ही व इंटरॅक्टिव्ह बोर्ड यांसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधांची माहिती देत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा दृढ संकल्प स्पष्ट केला.
गिरीश सरवटे यांनी मार्गदर्शन करताना, पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून घेणे हे मुलांच्या बौद्धिक व सांस्कृतिक जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन केले. शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ५०,००० रुपयांची देणगी शाळेसाठी जाहीर केली, ज्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाळेचा वार्षिक अहवाल सौ. स्नेहा शिरसाट यांनी वाचन करून मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप परब, प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल होळकर यांनी केले. तर आभार सहाय्यक शिक्षक संत प्रसाद परब यांनी मानले. एकूणच हा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक अभिव्यक्ती व सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर दर्शन घडवणारा ठरला.

error: Content is protected !!