

कमर्शियल गॅस तुटवड्यानंतर घरगुती सिलिंडरसाठी गर्दी
तुटवड्याच्या भीतीने नागरिकांची धावपळ
कुडाळ : प्रतिनिधी
आखाती देशांतील युद्ध परिस्थितीचा परिणाम देशभरात जाणवू लागला आहे. गॅस टंचाईच्या शक्यतेमुळे सिंधुदुर्गातही नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज (गुरूवारी) कुडाळ शहरातील खरेदी-विक्री संघाच्या गॅस वितरण केंद्राबाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. रिकामे सिलिंडर घेऊन अनेक ग्राहक बुकींगसाठी रांगेत उभे असल्याचे चित्र सकाळपासून होते.
गेल्या चार दिवसांपासून कमर्शियल गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता घरगुती गॅस सिलिंडरचाही पुरवठा खंडित होईल की काय, या भीतीने नागरिकांमध्ये घाईगडबड सुरू झाली आहे. कुडाळ मधील गॅस वितरण केंद्रांवर घरगुती सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसून येत आहे. घरगुती गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी ओटीपी प्रणाली बंधनकारक करण्यात आल्याने ग्राहकांना प्रत्यक्ष केंद्रावर येऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.









