ठळक घडामोडी

गाबीत वाड्यांची सीमांकन प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल!

मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांची माहीती

मालवण : प्रतिनिधी
      गाबीत समाजाच्या वस्त्या सर्व्हेक्षण व सीमांकन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच महसूल विभाग, भूमीअभिलेख, बंदर विभाग व मत्स्य विभाग यांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मालवण किनारपट्टीवर प्रत्यक्ष पाहणीतून गाबीत वाड्यांचे सर्व्हेक्षण करून सीमांकन करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात येईल, असे आश्वासन मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी गाबीत समाजाच्या प्रतिनिधींना दिले.
     गाबीत समाजाच्या वस्त्या सर्वेक्षण व सीमांकन प्रक्रिया स्थानिक गाबीत समाजास सोबत घेऊन वस्तुस्थिती दर्शक राबविण्यात यावी, यासाठी गाबीत वस्तीत घरोघरी सर्व्हे करण्यात यावे, अशी मागणी गाबीत फिशरमन फेडरेशनच्या वतीने मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश लव्हे यांच्या अध्यक्षतेखाली गाबीत समाज प्रतिनिधी, बंदर विभाग, भूमिअभिलेख विभाग व महसूल विभाग यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी मालवणचे बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, गाबीत फिशरमेन फेडरेशनचे अध्यक्ष बाबा मोंडकर, गाबीत समाज मालवणचे तालुकाध्यक्ष प्रमोद कोळंबकर, छोटू सावजी, बाबी जोगी, सुरेश बापर्डेकर, विकी चोपडेकर, संजय केळूसकर, तसेच भूमीअभिलेख विभागाचे अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी व इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी तहसीलदार गणेश लव्हे यांनी शासनाकडून प्राप्त आदेशानुसार कोकण किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यात कोळीवाडा सीमांकन करावयाचे आहे, अशी माहिती दिली. मात्र यावर बाबा मोंडकर यांनी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आदेशानुसार गाबीत वाडे व त्यांच्या शेरे जमिनी यांचे सीमांकन करावयाचे असल्याचे सांगितले. यावेळी या विषयावर सकारात्मक चर्चा होऊन तहसीलदार गणेश लव्हे यांनी याबाबत आपण जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करू, असे सांगितले. तसेच यावेळी तहसीलदारांनी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना मालवण तालुक्याच्या किनारपट्टीवरील गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन गाबीत वाड्यांचे सीमांकन करावे व किनाऱ्यावरील नकाशावर गाबीत वाडे नमूद करावेत, अशा सूचना देत याबाबत भूमीअभिलेखच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करू असे सांगितले. तसेच यासाठी महसूल विभाग बंदर विभाग व मत्स्य विभाग यांचेही सहकार्य घेण्यात यावे, असेही तहसीलदार यांनी सूचित केले.
     या सर्व्हेक्षणासाठी लवकरच कार्यक्रम जाहीर करावा, मालवण तालुक्यात गाबीत समाजाची वस्ती मोठी असल्याने मालवणमधूनच सर्वेक्षण व सीमांकन प्रक्रिया सुरु करण्यात यावी, त्यानंतर वेंगुर्ला व देवगड येथे ही प्रक्रिया राबविणे सुलभा होईल, असे यावेळी गाबीत समाज प्रतिनिधीनी सांगत या सर्व्हेक्षणासाठी गाबीत समाजाचेही सहकार्य लाभेल, असेही सांगितले.

error: Content is protected !!