ठळक घडामोडी

कलावंतांची भूमी नेरूर विकासाच्या नव्या पर्वाकडे; रुपेश पावसकर यांचा लोकाभिमुख वचननामा जाहीर!

नेरूरच्या मातीसाठी, माणसांसाठी आणि भविष्याच्या पिढीसाठी विकासाचा शब्द

कुडाळ : प्रतिनिधी
            नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार रुपेश अशोक पावसकर यांनी विकासकेंद्री, लोकाभिमुख आणि दूरदृष्टीपूर्ण वचननामा जाहीर करत निवडणूक रिंगणात ठाम पाऊल टाकले आहे. नेरूर पंचक्रोशीचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच माझे ध्येय,” असा स्पष्ट निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
        कलावंतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या नेरूर पंचक्रोशीतील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी नेरूर विभागात स्वतंत्र कलादालन उभारण्याचे ठोस आश्वासन पावसकर यांनी दिले. ग्रामीण भागातील कला, संस्कृती आणि परंपरांना चालना देण्यावर त्यांचा विशेष भर राहणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व शासकीय योजना मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविणे, ग्रामीण जनतेच्या आरोग्यविषयक प्रश्नांसाठी नियमित आरोग्य शिबिरांचे आयोजन, तसेच नेरूर विभागातील पर्यटन विकासातून स्थानिक नागरिक व बचतगटांसाठी रोजगारनिर्मिती करण्याचा संकल्प त्यांच्या वचननाम्यात अधोरेखित करण्यात आला आहे.
        नेरूर विभागातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता, तातडीने निधी उपलब्ध करून रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. यासोबतच महावितरणकडून नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात ठाम भूमिका घेत नेरूरसाठी स्वतंत्र विद्युत सबस्टेशन तसेच मुख्य ११ के.व्ही. विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल, असेही पावसकर यांनी स्पष्ट केले.
         यापूर्वी नेरूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम केलेल्या रुपेश पावसकर यांना मतदारसंघातील प्रश्न व गरजांची सखोल जाण आहे. गरीब व गरजू नागरिकांना आर्थिक सहाय्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, क्रीडा स्पर्धांसाठी सहकार्य, तसेच कोरोना काळात मोफत जेवण, जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्यसेवा पुरविण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.
        नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची एक संधी मला द्यावी. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असे प्रामाणिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करण्याचा माझा निर्धार आहे,असे आवाहन त्यांनी मतदारसंघातील जनतेला केले. ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनीही पावसकर यांच्या प्रचारात उतरत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. दरम्यान, त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रचारादरम्यान पंचायत समिती उमेदवार दिप्ती नाईक व अर्चना बंगे यांनाही जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. जनतेचा विश्वास आमच्या पाठीशी असून, विजय निश्चित आहे,असा ठाम विश्वास रुपेश पावसकर यांनी यावेळी व्यक्त केला.

error: Content is protected !!