ग्रामस्थांच्या सहभागातून उभी राहिली आदर्श शाळा
भौतिक व शैक्षणिक सुविधांनी समृद्ध शाळेचा गौरव
कुडाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा ३ या स्पर्धेत आकेरी हुमरस येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने प्राथमिक गटातून कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
‘गाव करेल ते राव काय करेल’ या उक्तीप्रमाणे पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी तसेच गावच्या मुंबई मंडळाच्या सहकार्याने भौतिक व शैक्षणिक सुविधांनी युक्त अशी आदर्श शाळा उभी राहिली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिप्ती तळवणेकर यांचे उत्कृष्ट नेतृत्व तसेच केंद्रप्रमुख दिनकर तळवणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश, व्यावसायिक शिक्षण, विद्यार्थी बचत बँक, सुसज्ज वाचनालय, प्रयोगशाळा, प्रशस्त मैदान, आकर्षक रंगरंगोटी, सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व वर्गांमध्ये स्मार्ट टीव्ही, वायफाय सुविधा, सौरऊर्जा प्रकल्प, संगणक कक्ष, रेन हार्वेस्टिंग, बायोगॅस प्रकल्प, ओला-सुका कचरा व्यवस्थापन, गांडूळ खत प्रकल्प, सुसज्ज शौचालय, परसबाग तसेच मेडिसीन पार्क आदी सुविधांमुळे ही शाळा सर्वार्थाने आदर्श ठरली आहे.
शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून शाळा व्यवस्थापन समिती, भौतिक व विद्यार्थी विकास समिती, माजी विद्यार्थी संघ, ग्रामपंचायत हुमरस, पालक व ग्रामस्थ यांनी या यशात मोलाचे योगदान दिले. या सर्वांचे मुख्याध्यापिका सौ. दिप्ती तळवणेकर यांनी आभार मानले.









