कुडाळ : प्रतिनिधी
मालवण किनारपट्टीवरील सीआरझेड (CRZ) नोटिसींच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी सोमवारी कुडाळ येथील प्रांत कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांची भेट घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
मालवण किनारपट्टीवरील काही बांधकामांविरोधात राष्ट्रीय हरित लवाद (ग्रीन ट्रिब्युनल) येथे तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासनाने काही मच्छिमारांना नोटिसा बजावल्या होत्या. या कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, काही व्यक्तींच्या तक्रारीमुळे सर्वसामान्य व गोरगरीब मच्छिमारांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला धक्का लागणार नाही, यासाठी आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून प्रयत्न करणार आहोत. आवश्यक कागदपत्रे प्रशासनाला सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला तहसीलदार सचिन पाटील, नगरसेवक रविकिरण उर्फ विकी तोरसकर, महेश कोयंडे, तसेच मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चेनंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली असून, सामंजस्याने मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
…तर वनमंत्र्यांना त्याच भाषेत उत्तर
दरम्यान, गणेश नाईक यांच्यावर टीका करताना राणे यांनी कोकणातील वाढत्या जंगलतोडीचा मुद्दा उपस्थित केला. वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकरी अडचणीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, त्यांच्या नेते एकनाथ शिंदे यांच्यावर वक्तव्य करू नये, अन्यथा त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.









