ठळक घडामोडी

मातोंड येथे मच्छिविक्रेत्या महिलेवर चाकू हल्ला; मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न

मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून महिलेवर हल्ला

मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न; परिसरात भीतीचे वातावरण

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
     वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे एका मच्छिविक्रेत्या महिलेवर दोन अज्ञात चोरट्यानी मोटारसायकल वरून येत हल्ला करत मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेवर त्यांनी चालू हल्ला सुद्धा केला यात त्या महिलेच्या डोक्याला व हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत वेंगुर्ला पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
   मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील ग्रामस्थांनी व संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती महिला मातोंड येथील चव्हाटा ते सावंतवाडा मुख्य रस्त्यावर असलेल्या तुळसकरवाडी याठिकाणी घरोघरी मासे विक्री साठी येते. दरम्यान शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास ती महिला याच रस्त्यावरून जात असताना अचानक मागून दोन अज्ञात इसम आपले तोंड बांधून मोटारसायकलवरून आले व त्या महिलेच्या मंगळसुत्राला हात घातला. तसेच तिच्या डोक्यावर जड वस्तूने वार केला. यात तिने आरडाओरडा करून त्यांच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना चोरट्यानी तिच्या हातावर चाकूने वार करत सावंतवाडाच्या दिशेने पलायन केले. या सर्व प्रकारात महिला रस्त्यावर पडून तिला दुखापत झाली तसेच डोक्याला व हाताला दुखापत झाली. ती महिला घाबरलेल्या स्थितीत शेजारी असलेल्या ग्रामस्थांच्या घरी गेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हे चोरटे परप्रांतीय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!