ठळक घडामोडी

दोडामार्गमध्ये अखेरच्या दिवशी राजकीय रणधुमाळी!

जि.प. ३ गटांसाठी २१, पं.स. ६ गणांसाठी ३६ अर्ज दाखल

माटणे गट ‘हाय व्होल्टेज’; तब्बल १२ उमेदवार रिंगणात, चुरस वाढली

दोडामार्ग : प्रतिनिधी
       दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली. जिल्हा परिषदेच्या तीन गटांसाठी तब्बल २१, तर पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी दिली. विशेष म्हणजे, तालुक्यात ‘हाय व्होल्टेज’ ड्रामासाठी ओळखल्या जाणाऱ्या माटणे जिल्हा परिषद गटासाठी सर्वाधिक १२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून, या गटातील लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
       नामनिर्देशन प्रक्रियेच्या पहिल्या चार दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने राजकीय वर्तुळात शांतता होती. मात्र बुधवारी शेवटच्या दिवशी चित्र पूर्णपणे बदलले. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची तहसील कार्यालयात एकच झुंबड उडाली. अखेरच्या क्षणापर्यंत चाललेल्या हालचालींमुळे निवडणूक वातावरण तापले. अचानक वाढलेल्या नामनिर्देशनांमुळे दोडामार्ग तालुक्यातील निवडणूक लढत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, पुढील टप्प्यात माघारी आणि प्रचाराच्या रणधुमाळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
       जि.प. मणेरी गटातून ४, साटेली भेडशीतून ५ व माटणेतून १२ नामनिर्देशनपत्र, पं.स. कोलझर गणातून ६, मणेरीतून १०, कोनाळ ८, साटेली भेडशीतून ४, झरेबांबरमधून ५  व माटणेतून ३ नामनिर्देशनपत्र दाखल केले असल्याची माहिती लक्ष्मण कसेकर यांनी दिली.
    माटणे गटात तब्बल १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे येथील चुरस नक्कीच वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या मतदार संघात भाजपाचे राजेंद्र म्हापसेकर, दीपक गवस व एकनाथ नाडकर्णी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर ठाकरे शिवसेनेचे संजय गवस व बाबुराव धुरी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे यापैकी कोण आपले नाम निर्देशन पत्र मागे घेतो? कोणाला उमेदवारी मिळणार? पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने कोण बंडखोरी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

error: Content is protected !!