कुडाळ : प्रतिनिधी
तालुकास्तरावर अव्वल ठरल्यानंतर जिल्हास्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध करत सरंबळ इंग्लिश स्कूल या हायस्कूलच्या हर्ष सुधीर टेमकर आणि शौर्य संतप्रसाद परब या विद्यार्थ्यांनी विज्ञानप्रदर्शन प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कुडाळ तालुक्यातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा व बुद्धिमत्तेचा गौरव करणारे ५३ वे कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०२५–२६ हे श्री. प्रमोद धुरी महाविद्यालय, साळगाव (ता. कुडाळ) येथे उत्साहपूर्ण वातावरणात नुकतेच संपन्न झाले. या प्रदर्शनातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक पटकावून सरंबळ हायस्कूलचे विद्यार्थी हर्ष सुधीर टेमकर आणि शौर्य संतप्रसाद परब यांनी शाळेच्या नावलौकिकात भर घातली. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल हर्ष व शौर्य यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
तालुकास्तरीय स्पर्धेत मिळालेल्या या उज्ज्वल यशामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली. या संधीचे सोने करत विद्यार्थ्यांनी ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०२५–२६, जे मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी येथे संपन्न झाले. यामध्येही आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवत प्राथमिक विभागात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
या उल्लेखनीय यशामागे मार्गदर्शक शिक्षक संदीप परब आणि भरत चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेली वैज्ञानिक जिज्ञासा कारणीभूत ठरली. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल होळकर यांनी विद्यार्थ्यांना मेडल, प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी प्रदान करून गौरविले. याप्रसंगी सरंबळ ग्रामस्थ समता संघ मुंबई संचलित संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र परब, शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, शाखा चिटणीस प्रसाद साटम, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवर्ग, माता–पालक संघाचे उपाध्यक्ष व सर्व मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









