ठळक घडामोडी

एमएनजीएलच्या कामांबाबत नागरिकांच्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल!

नगरसेविका संध्या तेरसेंची माहीती

कुडाळ मुख्याधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून एमएनजीएलला दिले निर्देश
कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ शहरात सुरू असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास थांबवावा तसेच खोदाई केलेले रस्ते व जागा तातडीने पूर्ववत करून द्याव्यात, या मागणीसाठी भाजपा नगरसेवक, शिवप्रेमी तसेच स्थानिक रहिवाशांच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले होते. आमच्या या मागणीची दखल घेत कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिका-यांनी शहरात प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण शहरात गॅस पाइपलाइनचे काम करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता घ्यावी तसेच खोदाई केलेले रस्ते, व इतर ठिकाणे त्वरित पूर्ववत करून देण्यात यावीत, असे लेखी निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहीती भाजपाच्या नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
सौ.तेरसे माहीती देताना म्हणाल्या की, न.पं.च्या मुख्याधिका-यांनी एमएनजीएलला लेखी पत्र देऊन स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यात वायू वाहिन्याद्वारे घरोघरी नैसर्गिक वायू पुरविण्यासाठी जमीनीखालून पाईपलाइन टाकण्यासाठी खोदकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. नगरपंचायत क्षेत्रामध्ये जमीनीखालून पाईपलाइन टाकण्यासाठी खोदकाम केलेले रस्ते पुणर्भरण करण्याबाबत नगरपंचायतीकडून वारंवार नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी रस्ते पुणर्भरण केले जात आहेत. परंतू नगरपंचायत हद्दितील ठरावीक ठिकाणचे रस्ते पाइपलाईन टाकल्यानंतर व्यवस्थित रित्या पूर्ववत केले जात नसल्याने अश्या प्रकारच्या कामामुळे पादचारी व वाहनधारकांना रस्त्यावरुन प्रवास करणे धोकादायक बनले जाते. तरी टप्प्या टप्प्याने ज्या ठिकाणी खोदाई केली जाते त्या ठिकाणी मुरूम दबाई करुन पृष्ठभाग समतोल करावा. नगरपंचायत हद्दित नागरीकांची तसेच इतर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असते. नगरपंचायत हद्दित वायू वाहिन्याव्दारे घरोघरी नैसर्गिक वायू पुरविण्यासाठी जमीनीखालून पाईपलाइन टाकण्यासाठी खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी खोदलेले रस्ते पुणर्भरण न केल्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत अगर वित्त हानी उद्भवू नये या करीता योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, तसे न केल्यास व कोणतीही जिवीत अगर वित्त हानी उद्भवल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल, असे स्पष्ट निर्देश मुख्याधिका-यांनी एमएनजीएलच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नगरपंचायत हद्दित पाईपलाइन टाकण्यासाठी खोदकाम करण्यापुर्वी न.पं. कार्यालयाकडील पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग व बांधकाम विभाग यांना पुर्वसुचना देवून या कार्यालयाशी समन्वय ठेवून काम करावे, असेही मुख्याधिका-यांनी नमूद केले आहे अशी माहिती नगरसेविका सौ.तेरसे यांनी दिली. भाजपा नगरसेवक, शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या या मागणीमुळे प्रशासनाने तात्काळ पावले उचलल्याने कुडाळ शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, अशी माहिती सौ. संध्या तेरसे यांनी दिली.

error: Content is protected !!