कर्नाटक वनविभागाचा दुजोरा
हत्ती दोडामार्गात शिरण्याची भीती
दोडामार्ग : प्रतिनिधी
एकीकडे दोडामार्ग तालुक्यात सहा हत्तींचा कळप उपद्रव माजवित असताना दुसरीकडे १२ हत्तींचा कळप तालुक्याच्या सीमेवरील कर्नाटकत ठाण मांडून आहे. शिवाय याला कर्नाटक राज्यातील कणकुंबी वनविभागाने दुजोरा दिला आहे. हा कळप तालुक्यात दाखल झाल्यास वनविभागाची डोकेदुखी वाढणार असून शेतकरी मात्र देशोधडीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोडामार्ग तालुक्यात दोन दशकांपूर्वी खानापूर (कर्नाटक राज्य) मान गावातून हत्ती दाखल झाले होते. येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करत हत्ती तिलारी खोऱ्यात स्थिरावले. दरम्यान ते तळकट पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुका व गोवा राज्यातही दाखल झाले. सध्या तिलारी खोऱ्यात सहा हत्तींचा कळप धुमशान घालत आहे. या हत्तींना आवरणे वनविभागाला डोईजड होत आहे.
एकिकडे सहा हत्ती वनविभागाच्या नाकीनऊ आणत असताना तब्बल बारा हत्तींचा कळप तालुक्याच्या सीमेलगतच्या खानापूर तालुक्यातील जांबोटी दशक्रोशीत बारा हत्तींचा कळप दाखल झाल्याची वार्ता बुधवारी सकाळी समजली. यावेळी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेची जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी तात्काळ याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती येथील वन विभागाकडे केली. वनविभागाने देखील क्षणाचाही विलंब न दवडता एक पथक जांबोटीला रवाना झाले.
प
थकामध्ये काही ग्रामस्थ देखील होते. त्यांनी जांबोटी दशक्रोशीतील गावागावात जात हत्ती बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सविस्तर माहिती न मिळाल्याने अखेर हे पथक कणकुंबी वनपरिक्षेत्र कार्यालयात गेले. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना हत्तींबाबत विचारणा केली असता त्यांनी १२ हत्तींचा कळप आल्याचे मान्य केले.
खानापूर तालुक्यात १२ हत्तींचा कळप वावरत असल्याने तेथील वनविभागाची रॅपिड रिस्पॉन्स टीम २४ तास कार्यरत आहे. शिवाय सायंकाळी ६ नंतर ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी बाहेर न पडण्याच्या सूचनाही तेथील वनविभागाने गावागावात दिल्या आहेत, कशी माहिती कणकुंबी वन विभागाकडून देण्यात आली.









