पावशी जि.प.मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा घराघरांत संपर्क
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; उमेदवारांचा विजयाचा विश्वास

कुडाळ : प्रतिनिधी
पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील डिगस गावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार अमरसेन सावंत व पंचायत समिती उमेदवार नारायण उर्फ आप्पा मांजरेकर यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत घराघरांत संपर्क साधत प्रचार केला. उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत थेट संवाद साधला.
ठाकरे शिवसेनेचे जि.प. उमेदवार अमरसेन सावंत, डिगस पंचायत समिती उमेदवार नारायण मांजरेकर तसेच पावशी पंचायत समिती उमेदवार चित्रा पावसकर यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे. आज डिगस येथे अमरसेन सावंत व नारायण मांजरेकर यांच्या उपस्थितीत झंझावाती प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी ठाकरे शिवसेनेचा वचननामा घराघरांत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत विकासाचे स्पष्ट व्हिजन मतदारांसमोर मांडण्यात आले. प्रचारादरम्यान मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून पावशी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास अमरसेन सावंत, नारायण मांजरेकर व चित्रा पावसकर यांनी व्यक्त केला.
डिगस येथे सकाळी पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. दिवसभरात डिगस कारीवणे टेंबवाडी, डॉ. आंबेडकरनगर, तळेवाडी, मुंडवेलवाडी, जाधववाडी, हिंदेवाडी, सातरेवाडी, कर्ल्याचे गाळू, पाताडेवाडी, जुवाडवाडी, टेंबवाडी, मोठी घाणेवाडी, धावलेवाडी, चोरगेवाडी, सुर्वेवाडी आदी भागांत प्रचार फेरीचे नियोजन करण्यात आले होते.







