तरुणीच्या धाडसाने बालकाचे प्राण वाचले
पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकुळ; सहा जणांना चावा
सावंतवाडी : प्रतिनिधी
शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून, बाहेरचावाडा परिसरात एका चार वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात बालकाच्या मानेला जखम झाली, मात्र समीरा खलील या तरुणीने जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.
बाहेरचावाडा येथे घराबाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय बालकावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक झडप घातली. कुत्र्याने थेट बालकाच्या मानेचा चावा घेतल्याने रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. बालकाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची कार्यकर्ती समीरा खलील तिथे धावून आली. तिने क्षणाचाही विलंब न लावता कुत्र्याच्या तावडीतून मुलाची सुटका केली. मुलाच्या मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून समीरा यांनी त्याला तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या या बालकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे, आज सकाळपासून या पिसाळलेल्या कुत्र्याने शहरात तब्बल सहा जणांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.








