सामाजिक कार्यकर्ते समील जळवी यांची न.पं. मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
घरबांधणी, वीजजोडणी व बँक कर्ज प्रक्रियेत नागरिकांना अडचणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कविलकाटे मधील बहुतांश भाग ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत असून सदर ग्रीन झोनमधून या भागाची मुक्तता करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समील प्रभाकर जळवी यांनी कुडाळ न.पं.चे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून या भागातील ग्रीन झोन काढण्याची मागणी नगरपंचायतीच्या मुख्याधिका-यांकडे यावेळी करण्यात आल्याची माहीती श्री.जळवी यांनी दिली.
श्री.जळवी यांनी सोमवारी न.पं.चे मुख्याधिकारी श्री.औंधकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कविलकाटे क्रमांक १ वॉर्डमधील सुमारे ६० टक्के जमीन ग्रीन झोनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना घरबांधणी, घर दुरुस्ती तसेच घरासाठी आवश्यक वीजजोडणी घेणे यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
ग्रीन झोन लागू झाल्यामुळे संबंधित जमिनीवर कोणत्याही प्रकारची विकासकामे करता येत नसल्याने स्थानिकांना बँकांकडून गृहकर्ज मिळण्यात अडथळे येत आहेत. नवीन घरासाठी आवश्यक असलेला घर क्रमांक मिळविण्याची प्रक्रिया देखील रखडत असून त्यामुळे नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी त्रास सहन करावा लागत आहे.
या परिस्थितीमुळे कविलकाटे भागातील शेतकरी तसेच नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक कोणत्याही विकास प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नसल्याने त्यांना दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागत आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी या भागातील नागरिकांच्या अडचणींचा विचार करून कविलकाटे येथील जमिनीवरील ग्रीन झोन हटवून संबंधित भाग विकासासाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी समील जळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.









