ठळक घडामोडी

मालवण पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड!

स्वीकृत नगरसेवक म्हणून महेश कांदळगावकर, रविकिरण तोरसकर यांची वर्णी

मालवण : प्रतिनिधी
     मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे शिंदे शिवसेनेचे दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर (शिंदे शिवसेना) आणि मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर (भाजप) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. निवडणुकीत स्वतंत्र लढलेले शिंदे शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आज महायुती म्हणून सभागृहात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
     पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी केवळ दीपक पाटकर यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या अर्जाला गटनेत्या पुनम चव्हाण यांनी सूचक म्हणून तर सहदेव बापर्डेकर यांनी अनुमोदन दिले. अन्य कोणताही अर्ज न आल्याने ही निवड बिनविरोध झाली. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध कट्टर संघर्ष करणाऱ्या शिंदे शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी आज महायुती म्हणून सभागृहात पाऊल ठेवले. उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. यामुळे भविष्यात पालिकेचा कारभार महायुतीच्या माध्यमातून चालणार असल्याचे स्पष्ट झाले असून आगामी विषय समित्यांच्या निवडीत विशेषतः बांधकाम आणि महिला बालकल्याण यात भाजपला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
      निवडीनंतर नगरसेवकांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरले. यात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी प्रशासकीय राजवटीतील कचरा व्यवस्थापनाच्या कामांची आणि बिलांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसेच संबंधित ठेकेदाराने जे बिल सादर केले आहे ते मंजूर करू नये असे स्पष्ट केले. मंदार केणी यांनी मंजूर विकासकामे आणि त्यांच्या सद्यस्थितीची चौकशी करण्याची मागणी केली. तपस्वी मयेकर यांनी उपनगराध्यक्ष व दोन्ही स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर सभागृहाचे कामकाज ऑनलाइन करण्याची सूचना मांडली. महेंद्र म्हाडगुत यांनी प्रशासनाने नगरसेवकांना विचारलेली माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून कामाला गती मिळेल असे सांगितले.
       या निवडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे अभिनंदन केले. मात्र, अभिनंदनाच्या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
      शहराच्या विकासासाठी आपण सर्व लोकप्रतिनिधींनी आता एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. गेल्या चार वर्षांतील प्रशासकीय कारभारानंतर आता जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची आपली जबाबदारी आहे. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले. दरम्यान माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी सभागृहाचा आभारी आहे. सर्वांना सोबत घेऊन शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर भर दिला जाईल असे नवनियुक्त उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!