भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची आमदार निलेश राणेंची अधिवेशनात मागणी
कोकणातील लघु व मध्यम पाटबंधारे योजनांतील भ्रष्टाचारावर सभागृहात लक्षवेधी
कुडाळ : प्रतिनिधी
कोकणातील मध्यम व लघु पाटबंधारे योजनांच्या संदर्भात शनिवारी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडत शासनाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी कुडाळ तालुक्यातील आंब्रड–सारमळे येथील धरण प्रकल्पातील मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचार उघड केला. हा धरण प्रकल्प तब्बल २९ वर्षापासून रखडला असून २ कोटींचा हा प्रकल्प ३४ कोटींवर गेल्याने यात शासनाची मोठी फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी करीत कोकणातील धरण प्रकल्पांचे निकष बदलण्याची तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार निलेश राणे यांनी सभागृहात सांगितले की, आंब्रड–सारमळे धरण प्रकल्पाला सन १९९६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. या कामाची निविदा १९९८ साली पी. के. कोंडेकर (प्रतिभानगर, कोल्हापूर) या ठेकेदाराला देण्यात आली होती. त्यावेळी त्याची निविदा किंमत २ कोटी ५४ लाख ८३ हजार ८५० रुपये इतकी होती आणि २४ महिन्यांत म्हणजे सन २००० पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते.
मात्र, गेल्या २९ वर्षांत सातत्याने सुधारित मान्यता देत हा २ कोटींचा प्रकल्प आज ३४ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. मूळ निविदा किंमतीपेक्षा तब्बल ३२ कोटी रुपयांची वाढ झाली असूनही आजतागायत धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत या प्रकल्पावर सुमारे १६ कोटी ४० लाख रुपये खर्च झाले असून, अजूनही १८ कोटी ५३ लाख रुपये खर्च करायचे शिल्लक आहेत. हा प्रकार म्हणजे शासनाची सरळसरळ फसवणूक असून यात ठेकेदार व तत्कालीन अधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोप आमदार राणे यांनी केला. मृद व जलसंधारण विभागात अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पाटबंधारे प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच अपूर्ण प्रकल्पांसोबतच नवीन प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी होणाऱ्या विंधन विहीर खोदाई व इतर सर्वेक्षण कामांमध्ये जाणीवपूर्वक ठराविक ठेकेदारांनाच कामे देण्यात येतात. प्रत्यक्ष काम न करता बिले काढली जात असून, शासनस्तरावर चुकीचे अहवाल पाठविले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यामुळे गरज आणि क्षमता असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन धरणांची कामे रखडल्याचे आमदार राणे यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आमदार निलेश राणे यांनी सभागृहात केली.









