ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
पं.स.सदस्य योगेश धुरींनी वेधले अधिका-यांचे लक्ष
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून बीएसएनएलच्या नेटवर्कचा लपंडाव सुरू असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार नेटवर्क गायब होत असल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प होत आहेत. ही समस्या तात्काळ मार्गी लावून सेवा पूर्ववत करावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पं.स. सदस्य योगेश धुरी यांनी संबंधित विभागाला दिला आहे.
याबाबत ठाकरे युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख तथा माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी सावंतवाडी येथे बीएसएनएल अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी उपसरपंच बापू बागवे, विभागप्रमुख एकनाथ धुरी, ग्रामपंचायत सदस्य काजल नाईक, शहरप्रमुख सचिन भिसे आदी उपस्थित होते. नेटवर्कची समस्या तातडीने सोडवून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
माणगाव येथोल बँका, रुग्णालये, ग्रामपंचायत कार्यालय, ई-सेवा केंद्र तसेच विविध शासकीय व खासगी सेवा मोठ्या प्रमाणावर बीएसएनएल नेटवर्कवर अवलंबून आहेत. मात्र रेंज सतत खंडित होत असल्याने ऑनलाईन नोंदी, शासकीय कागदपत्रांची प्रक्रिया, बँकिंग व्यवहार आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण यावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः रुग्णालयीन सेवांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यापूर्वी युवासेनेच्या पुढाकारातून करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनाची दखल घेत बीएसएनएल प्रशासनाने फोर-जी सेवा सुरू केली होती. मात्र सध्या पुन्हा एकदा नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी सावंतवाडी येथे बीएसएनएल अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. सेवा लवकरात लवकर सुरळीत न झाल्यास ‘ठाकरे शिवसेना स्टाईल’ने आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा योगेश धुरी यांनी दिला.









