ठळक घडामोडी

वेंगुर्ला येथे ‘वेंगुर्ला–१० एमबी’ ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजू वाण विकसित

१५ वर्षांच्या संशोधनानंतर नवीन काजू वाणाची लागवडीसाठी शिफारस

कमी तेल, जास्त गर; ओल्या काजूगर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

वेंगुर्ला : प्रतिनिधी
     कोकणातील ओल्या काजूगराची वाढती मागणी आणि काजू बी मधून गर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे वेंगुर्ला–१० एमबी हे ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे नवीन वाण विकसित करण्यात आले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्पांतर्गत सुमारे १५ वर्षांच्या संशोधनानंतर या वाणाची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे यांनी वेंगुर्लेत दिली.
     या वाणामध्ये काजू बी टरफलामधील तेलाचे प्रमाण कमी (७.८७ टक्के), टरफलाची जाडी मध्यम असून ओल्या काजूगराचे प्रमाण सुमारे ३२ टक्के आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिक गर मिळत असून मजुरीत बचत होते तसेच हाताला होणारी इजाही कमी होते. चालू वर्षी हा वाण प्रसारित झाल्याने नवीन वर्षापासून या वाणाची कलमे शेतकऱ्यांसाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे उपलब्ध होणार आहेत, असे डाॅ.शिंदे म्हणाले.

error: Content is protected !!