२४ मीटर रस्ता रुंदीकरण होणार : अतिक्रमणे हटविणार
नगरपंचायतीचा निर्णय; सर्वसाधारण सभेत प्रशासनाची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील हॉटेल अभिमन्यू ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यानचा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाद्वारे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या मंजूर नकाशानुसार मध्यरेषेपासून दोन्ही बाजूंना प्रत्येकी १२ मीटर असा एकूण २४ मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येणार असून, रस्ता हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने आज नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत दिली.
सदर सभा नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगरसेवक तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
सभेत दत्तनगर येथील प्रस्तावित एमआरएफ कचरा विलिनीकरण केंद्र, सांगिर्डेवाडी येथील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प, मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांचा प्रश्न तसेच रखडलेल्या हायमास्ट कामावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मोकाट गुरे पकडण्याची मोहीम येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येणार असून, भटक्या कुत्र्यांची नसबंदी लवकरच करण्यात येईल, असे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले.









