ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, जतीन भिसे, भरत केसरकर यांना पुरस्कार प्रदान
पत्रकार व पाल्यांचा गौरव; मान्यवरांची उपस्थिती
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या आज झालेल्या शानदार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे गुणवंत पत्रकार आणि त्यांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर यांना व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हा पत्रकार पुरस्कार, जतीन भिसे यांना व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती छायाचित्रकार पुरस्कार तर भरत केसरकर यांना पत्रकार वसंत दळवी स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कुडाळ तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाला जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर, कुडाळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. पाटील, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, स्व.भैयासाहेब वालावलकर यांचे नातू माजी जि.प.सदस्य रणजित देसाई, पत्रकार कै. वसंत दळवी यांचे चिरंजीव रमाकांत दळवी, जिल्हा प्रतिनिधी राजन नाईक, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि भैयासाहेब वालावलकर, वसंत दळवी, बाळशास्त्री जांभेकर, स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तिन्ही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर यांना व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हा पत्रकार पुरस्कार, जतीन भिसे याना व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती छायाचित्रकार पुरस्कार तर भरत केसरकर यांना पत्रकार वसंत दळवी स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या पाल्यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघावर निवड झाल्याबद्दल राजन नाईक, जिव्हाळा सेवाश्रम गौरव पुरस्कार प्राप्त अजय सावंत, एम ए जर्नालिझम पदवी प्राप्त वैशाली खानोलकर, नृत्यसन्मान जीवन गौरव पुरस्कार प्राप्त निलेश जोशी आणि २५ किमी ची सायकल राईड करणाऱ्या प्रमोद ठाकूर यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मृणाल प्रमोद ठाकूर हिला व्हिजुअल आर्ट पदवी प्राप्त केल्याबद्दल, मृणाल अजय सावंत हिला नृत्यसन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल, अनुष्का अजय सावंत हिला बी.एस्सी फर्स्ट सेमिस्टर टॉपर केल्याबद्दल, ऍड. अश्विनी राजन नाईक हीची शासनाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉ ऑफिसरपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि परिणीती चंद्रशेखर मोरजकर हिची नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आलं.
यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या वतीने संतोष वायंगणकर आणि भरत केसरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री.वायंगणकर यांनी रोखठोक आणि परखड भाषित आजच्या पत्रकारितेवर भाष्य केले. तर भरत केसरकार यांनी ग्रामीण भागातील पत्रकारिता आणि पत्रकारिता करताना आलेले अनुभव सर्वांसोबत शेअर केले.
जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विकासात्मक पत्रकारिता करण्याचे आवाहन पत्रकारांना केले. येथील जनतेची मानसिकता बदल्याण्याचे काम पत्रकारानी करावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. आजचे युग हे एआय चे आहे त्याचा सर्वच क्षेत्रात वापर झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, रणजित देसाई यांनी देखील मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात उमेश तोरसकर यांनी सकारात्मक आणि विकासात्मक पत्रकारिता करावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य दीप्ती पडते, दादा साईल, नागेश आईर, गंगाराम सडवेलकर उपस्थित होते. त्यांचा बॅ नाथ पै शिक्षण संस्था आणि कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. दीप्ती पडते यांनी या सत्काराला उत्तर देताना पत्रकारांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला अमित सामंत, धीरज परब, जयराम डिगसकर, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे सचिव विठ्ठल राणे, खजिनदार अजय सावंत, उपाध्यक्ष रवी गावडे, विलास कुडाळकर, यांच्यासह प्रमोद ठाकूर, चंद्रकांत सामंत, प्रमोद म्हाडगूत, अरुण अणावकर, नाना बोगार, संजय कोरणे, पद्माकर वालावलकर, संजय तेंडोलकर, संजय जोशी, गोपाळ चव्हाण, काशिराम गायकवाड, राजाराम परब, सुभाष मोरजकर, निलेश ओरसकर, राकेश कांदे, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पालकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार तालुका अध्यक्ष विजय पालकर आणि जिल्हा प्रतिनिधी राजन नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश जोशी यांनी तर आभार प्रदर्शन अजय सावंत यांनी केले. यावेळी कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या बॅ नाथ पै संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा देखील सत्कार करण्यात आला.









