‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ – टप्पा ३ मध्ये उल्लेखनीय यश
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत कौशल्यविकासावर विद्यालयाचा विशेष भर
कुडाळ : प्रतिनिधी
शिक्षणाची चाकोरी बदलणारी शाळा, व्यवसाय पूरक शिक्षण देणारी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्ली कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक या प्रशालेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. शासनाचे विविध शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीकेंद्रित उपक्रम वेळोवेळी प्रभावीपणे राबवणारी ही शाळा म्हणूनही विद्यालयाची ओळख निर्माण झाली आहे. याच गुणवत्तेच्या बळावर विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – टप्पा ३ या उपक्रमात कुडाळ तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यालयात शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर विशेष भर दिला जातो. व्यवसाय पूरक शिक्षण, डिजिटल शिक्षण पद्धती, पर्यावरण संवर्धन उपक्रम, स्वच्छता व सुंदर शाळा अभियान, वृक्षारोपण, आरोग्य जनजागृती, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण होत आहे. या उपक्रमांमुळे विद्यालयाने पंचक्रोशी परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या यशामागे संस्था अध्यक्ष चंद्रशेखर सावंत, संस्था सचिव संभाजी वळंजू, संस्था पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ यांचे दूरदर्शी नेतृत्व लाभले आहे. मुख्याध्यापक सचिन धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक सतीश वारंग, क्रीडा शिक्षिका माधुरी खराडे, शिक्षक रामचंद्र पिकुळकर, सुप्रिया बांदेकर, अदिती परब, कविता राऊत, प्रशालेचे लिपिक राजेंद्र सावंत, तसेच शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मण लोट व लक्ष्मण बावदाने यांच्या परिश्रमामुळे हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांचा सक्रिय सहभाग देखील या यशात तितकाच महत्त्वाचा ठरला आहे. तसेच विद्यालयाला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन करणारे भगीरथ प्रतिष्ठान झारापचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांचे मार्गदर्शनही या यशात मोलाचे ठरले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय यशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्था पदाधिकारी, हितचिंतक व ग्रामस्थ यांचे विद्यालयातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. विद्यालयाने मिळवलेले हे यश भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण व उपक्रमशीलतेचा आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.









