घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत युनिट व सौर योजनेबाबत मार्गदर्शन
महिला सक्षमीकरणासाठी ग्रा.पं.चा पुढाकार; कापडी पिशव्या व गांडूळ खत बेडचे वाटप
कुडाळ : प्रतिनिधी
अणाव (ता.कुडाळ) ग्रामपंचायतीच्या वतीने रविवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत अणाव दाभाचीवाडी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. यात घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत युनिट तसेच कापडी पिशव्या वाटप तसेच सौर योजना आणि महिला सक्षमीकरण बाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी अणाव गावचे सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच सौ.आदिती अणावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर, ग्रा.पं.सदस्य रावजी जिकमडे, सौ.महिमा जिकमडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनायक अणावकर, माजी सरपंच आप्पा मांजरेकर, माजी सरपंच सौ. सेजल पाटकर, ॲग्रीकार्ट संचालक सचिन चोरगे, यश एंटरप्रायजेसचे श्री. भालेकर, श्री. पाटकर, माजी ग्रा.पं.कर्मचारी संतोष अणावकर, ग्रा.पं. कर्मचारी वैभव अणावकर, सौ.अमृता दळवी, अनिकेत पाटकर, महेश पाटकर आदींसह दाभाचीवाडी मधील ग्रामस्थ, महिला बचतगट प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला दाभाचीवाडी ग्रामस्थांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच लिलाधर अणावकर, म्हणाले, सर्वानी या योजनांचा लाभ घ्यावा तसेच महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर यांनी प्रास्ताविकात योजनेची सविस्तर माहीती दिली. ॲग्रीकार्ट संचालक श्री. चोरगे यांनी गांडुळ खत कसे तयार करायचे याबाबत सखोल माहिती दिली. श्री. भालेकर यांनी सौर ऊर्जेविषयी माहिती सांगताना सूर्याकडून मिळालेली उर्जेचा वापर सौर ऊर्जेत रूपांतर करून अपारंपारीक ऊर्जा स्त्रोताचे महत्व सांगीतले. पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घेण्याचेही आवाहन केले. आपले अणाव गावाला सर्वतोपरी सहकार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी ग्रामस्थांना घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा बाबत तसेच शासनाच्या विविध योजनांच्या ॲप्सची माहिती देण्याताले. गांडुळ खत बेड वाटप, कापडी पिशव्या वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन आप्पा मांजरेकर यांनी केले.









