ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा
मालवण : प्रतिनिधी
मच्छीमारांच्या घरांवर नांगर फिरवणाऱ्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या सत्तेचा वापर करून ही घरे कशी वाचवणार हे सांगावे, असे आव्हान देतानाच जर महसूल विभागाने या नोटिसांचा जाच थांबवला नाही, तर येत्या दोन-तीन दिवसांत रणनीती ठरवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील आणि प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, नितीन वाळके, महेश जावकर, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, नगरसेविका अनिता गिरकर, हेमंत मोंडकर, बंडू सरमळकर, चिंतामणी मयेकर, चंदू खोबरेकर, सिद्धेश मांजरेकर, दत्ता पोईपकर, सुरेश मडये, पॉली गिरकर आदी उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करणाऱ्या निलेश राणे आणि दत्ता सामंत यांना ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मोदींच्या दौऱ्यावेळी किनारपट्टीवरील मच्छीमारांना नोटिसा कुणामुळे आल्या?’ आमदार वैभव नाईक यांनी विचारलेला प्रश्न अत्यंत रास्त आहे. किनारपट्टीवर ३५२ नोटिसांचा जो पाढा वाचला जात आहे, त्यातील बहुतांश नोटिसा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालवण दौऱ्याच्या वेळी काढण्यात आल्या होत्या. त्यावेळी मच्छीमारांची जाळी ठेवण्याची शेड आणि राहती घरे तोडताना निलेश राणे आणि दत्ता सामंत गप्प का होते? आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही मच्छीमारांच्या नुकसानीकडे डोळेझाक केली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या टीकेचा समाचार घेताना खोबरेकर म्हणाले, माजी आमदार वैभव नाईक यांनी आणलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निधीतून तुम्ही ठेकेदारी केली. देवबाग आणि तोंडवळी येथे बंधाऱ्यासाठी जो दगड जात आहे, तो आमदार नाईक यांनी आणलेल्या निधीतूनच आहे. एकीकडे त्यांच्या निधीतून आपली घरे भरता आणि दुसरीकडे त्यांच्यावरच टीका करता, ही दुटप्पी भूमिका जनता ओळखून आहे. शासनाने एकीकडे कोळीवाड्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र हे सर्वेक्षण पूर्ण होण्याआधीच मच्छीमारांना फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन नोटिसा बजावल्या जात आहेत. वर्षानुवर्षे किनारपट्टीचे रक्षण करणाऱ्या आणि जिल्ह्याला परकीय चलन मिळवून देणाऱ्या मच्छीमारांनी कोणता गुन्हा केला आहे?” असा प्रश्न करत हा सरकारचा मच्छीमारांना विस्थापित करण्याचा डाव असल्याचा आरोप खोबरेकर यांनी केला.
तुमचे बंधू पालकमंत्री आहेत, वडील खासदार आहेत, मग मच्छीमारांच्या नोटिसा रद्द का करत नाही?. देवबागमध्ये मंजूर झालेल्या १ कोटीच्या बंधाऱ्याचे काम का झाले नाही? त्याचे पैसे कोणी जिरवले, याचे उत्तर देवबागवासीयांना द्या असे आव्हानही श्री. खोबरेकर यांनी दिले आहे.
मच्छीमारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. या जिल्ह्याला वैभव मिळवून देणाऱ्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खंबीरपणे उभी आहे, असा ठाम निर्धार श्री. खोबरेकर यांनी शेवटी व्यक्त केला. किनारपट्टीवरील ज्या मच्छिमार बांधवांना नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. त्यांना मार्गदर्शन तसेच कायदेशीर उत्तर देण्यासाठी सीआरझेडची तज्ञा व्यक्ती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी ठाकरे शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केले आहे.









