ठळक घडामोडी

नेरूर जि.प.मध्ये स्थानिक उमेदवारांचाच दबदबा..!

नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी – ठाकरे शिवसेनेचा विजय निश्चित – शेखर गावडे

कुडाळ : प्रतिनिधी
         सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघात राजकीय वातावरण तापलेले आहे. नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत उमेदवार रुपेश पावसकर, दिप्ती नाईक (उत्तर पंचायत समिती) आणि अर्चना बंगे (दक्षिण पंचायत समिती) यांनी निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
      शिवसेना (उबाठा)पक्षाचे विभागप्रमुख शेखर गावडे यांनी गुरूवारी नेरूर चव्हाटा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले, नेरूर आणि पंचक्रोशीतील घराघरात प्रचार करण्यात आला असून आमचा विजय निश्चित आहे. नेरूर गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ठरवले आहे की त्यांना स्थानिकच उमेदवार पाहिजेत, त्यामुळे दुसरा उमेदवार चालणार नाही. नेरूर जिल्हा परिषदेत तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. नेरुर भागात  प्रवेश दाखवले जात आहेत, परंतु हे प्रवेश कोणासाठी आहेत हे ग्रामस्थांना माहीत आहे. हे प्रवेश पक्षाच्या नेत्यांना खुश करण्यासाठी केले जात आहेत. शिवसेना उबाठा पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याने दुसर्‍या पक्षात प्रवेश केला नाही. त्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते नेरूर विभागात टिकून आहेत. तसेच, नेरूर ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य देखील आमच्या पक्षाच्या पाठीशी ठाम आहेत,असे त्यांनी ठाम मत व्यक्त केले. यावेळी उमेदवार रुपेश पावसकर, रोशनी नाईक, गणेश गावडे, निकिता सडवेलकर, रुचा पावसकर, समीर नाईक, सुचित्रा नेरुरकर हे उपस्थित होते.

error: Content is protected !!