ठळक घडामोडी

भाजपा ओरोस मंडल अध्यक्षांसह ४३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
    सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर करण्यात आला आहे. मात्र हा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर अवघ्या तासातच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपात खळबळ उडाली आहे.
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, मी ओरोस मंडळ अध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला आता उचित वाटत नाही, यासह माझी कोणत्याही नेत्यावर नाराजी नाही तरी माझा हा राजीनामा त्वरित स्वीकारण्यात यावा असे नमूद केले आहे. हा राजीनामा त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना सादर केलाय. ही माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
     ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोसमंडळ मधील ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदय कुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, यांच्यासह अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह ओरोस मंडळ मधील बूथ अध्यक्ष शक्ति केंद्रप्रमुख, असे मिळून ४३ जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची वृत्त आहे. भाजपमध्ये सुरू झालेल्या या नाराजी नाट्यामुळे राजकीय वातावरण तापले असून मोठी खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!