ठळक घडामोडी

पिंगुळीत ठाकरे शिवसेनेचा झंझावात… सडवेलकर-राऊळ-धुरी यांना जनतेचा उत्स्फूर्त कौल

जनसेवेला प्राधान्य; पिंगुळीत ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : प्रतिनिधी
        पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती उमेदवार ममता राऊळ व कृष्णा धुरी यांच्या प्रचाराला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, लोकाभिमुख वचननाम्याच्या जोरावर मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा झेंडा निश्चित फडकणार, असा ठाम विश्वास उमेदवार व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
         गंगाराम सडवेलकर यांनी जाहीर केलेल्या वचननाम्यात कोणताही भेदभाव न करता सर्व गावांना शासकीय योजनांचा लाभ, प्रलंबित विकासकामांना गती, सातत्यपूर्ण लोकसंपर्कातून सामाजिक समन्वय, युवक, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भक्कम सुविधा उभारण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे. रस्ते विकासासाठी भ्रष्टाचारमुक्त विशेष यंत्रणा राबविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. “एक दिवस गावासाठी” या उपक्रमातून प्रत्येक गावाशी थेट नाळ जोडण्याचा शब्द त्यांनी जनतेला दिला आहे.
        ठाकरे शिवसेनेचा वचननामा घराघरांत पोहोचविण्यात येत असून, या माध्यमातून माजी आमदार वैभव नाईक यांनी जनतेला ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच माजी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारसंघात तळ ठोकून मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला बळ दिले.
        प्रचारादरम्यान बोलताना गंगाराम सडवेलकर म्हणाले,ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर जनतेच्या विश्वासासाठी आहे. पिंगुळी मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक कुटुंब माझ्यासाठी समान आहे. निवडून आल्यानंतर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रामाणिकपणे काम करेन.
     दरम्यान, साळगाव पंचायत समितीचे उमेदवार कृष्णा दत्ताराम धुरी हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, वाडोस ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व शाखा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले आहे. गरजू नागरिकांना आर्थिक मदत, कोरोना काळातील मोठ्या प्रमाणावरील सहकार्य, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देत त्यांनी समाजकार्याचा वारसा पुढे नेला आहे.
        पिंगुळी पंचायत समितीच्या उमेदवार ममता दत्तगुरू राऊळ या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत, शासकीय योजना प्रभावीपणे राबविणे, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे आणि पर्यावरणस्नेही उपक्रमांद्वारे गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर त्यांचा भर आहे.
        पिंगुळी व साळगाव मतदारसंघात विकास, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख प्रशासनाचा अजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या या तिन्ही उमेदवारांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, ठाकरे शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

error: Content is protected !!