ठळक घडामोडी

दोडामार्गातील हत्ती प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा जन आंदोलनाचा इशारा

दोडामार्ग : प्रतिनिधी
    तालुक्यात दाखल झालेला ओंकार हत्ती सध्या घोटगेवाडी परिसरात पोहोचला आहे. तो तिलारी खोऱ्यातील हेवाळे परिसरात दाखल होण्यापूर्वीच वनविभागाने त्याला पिटाळून लावावे. तसेच तालुक्याला कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल द्यावा. अन्यथा लवकरच मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी हत्ती बाधीत गावातील संतप्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.
ओंकार हत्ती कळणे परिसरातून शिरवल गावात गुरुवारी सायंकाळी दाखल झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत केर निडलवाडी येथून घोटगेवाडी येथील शेतकऱ्यांच्या केळी बागायतीत घुसला. लवकरच तो तेथून पाळये सोनावल मार्गे हेवाळे परिसरात दाखल होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे. दरम्यान घाटीवडे येथे गणेश टस्कर व पिल्लू ठाण मांडून बसले आहेत.
     ओंकार हत्ती अधिक आक्रमक झाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तिलारी खोऱ्यातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये हत्तींचे कमालीचे भय असताना वनविभागाचे तालुक्याचे प्रमुख पद प्रभारी आहे. त्यामुळे हत्तीप्रश्न अधिक जटील बनल्याचा आरोप शेतकरी करत आहेत‌. प्रभारी अधिकारी कार्यालयात मिळत नसल्याने हत्ती नुकसानीचे गाऱ्हाणी मांडायची कोणाकडे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल यांची नेमणूक करावी. तसेच आक्रमक बनलेल्या ओंकार हत्तीसह इतर हत्तींना वनविभागाने तात्काळ पिटाळून लावावे अशी मागणी हत्ती बाधित शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.

error: Content is protected !!