

पणदूर – घोडगे मार्गावरही गव्यांचे दर्शन
ग्रामस्थ, वाहनधारकांमध्ये घबराट
गवा रेड्यांच्या बंदोबस्ताची ग्रामस्थांची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील डिगस–सुर्वेवाडी परिसरात लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पणदूर–घोडगे रस्त्यावर डिगस चोरगेवाडी तलावाजवळ आज (शुक्रवार दि.२ जाने.) रात्री आठ वाजताच्या सुमारास वाहनधारकांना गवा रेड्यांचे दर्शन झाले. त्यानंतर काही वेळातच चोरगेवाडी फाटा ते हिंदेवाडी रस्त्यालगत सुर्वेवाडी परिसरातही गवा रेडा आढळून आला. तेथील रस्त्याने जाणा-या वाहनधारकांना हा गवारेडा दिसून आला. या भागात गेल्या काही दिवसांपासून गवा रेड्यांचा वावर वाढला असून, रात्रीच्या वेळी हे गवा रेडे रस्त्यांवर दाखल होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. लोकवस्ती व वाहतूक असलेल्या रस्त्यांवर गवा रेड्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने वनविभागाने तातडीने दखल घेऊन या गवा रेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.









