फुलपाखरांच्या दुनियेतून निसर्ग शिक्षण; कुडाळच्या विद्यार्थ्यांचा अनोखा अनुभव
पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढवणारी पारपोली गार्डनची शैक्षणिक सहल
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ एमआयडीसी मधील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल येथील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील पारपोली या प्रसिद्ध फुलपाखरांच्या गाव (पारपोली गार्डन) येथे भेट दिली. या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध रंगीबेरंगी फुलपाखरे जवळून पाहिली. तसेच जंगल परिसरात आढळणारे वाघाच्या पायांचे ठसे, ट्री हाऊस तसेच नदी परिसराचा आनंद घेतला. तेथील मार्गदर्शक व स्टाफ सदस्य राजेश कविटकर यांनी विद्यार्थ्यांना फुलपाखरांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सुमारे १८० प्रजातींच्या फुलपाखरांची ओळख करून देत फुलपाखरांचे जीवनचक्र, त्यांच्या आवडीनिवडी, पर्यावरणातील महत्त्व तसेच संरक्षणाची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम वाढीस लागले असून पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.
या शैक्षणिक उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांना या भेटीदरम्यान शिक्षक वैभवी नाईक, प्राजक्ता जाधव, पौर्णिमा शिरवलकर, साईश गणाचारी, सौ. म्हापसेकर, मिलिंद धोंड व चेतन गवळी यांचे सहकार्य लाभले.









