शहरातील २६ बँकांना व्यापारी संघटनेचे निवेदन
बँकांचा सकारात्मक प्रतिसाद
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज (गुरूवारी) कुडाळ शहरातील बँका तसेच पतसंस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन सुट्या पैशांची उपलब्धता त्वरित करून देण्याबाबत निवेदन दिले.
शहरातील व्यापाऱ्यांना व्यवहार करताना सुट्या पैशांची अडचण निर्माण होत असल्याने ही मागणी करण्यात आली. या वेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पी. डी. शिरसाट, उपाध्यक्ष संदेश पडते, सचिव महेश ओटवणेकर व खजिनदार अक्षय सावंत यांच्यासह शिष्टमंडळाने कुडाळ शहरातील २६ बँका तसेच पतसंस्थांना भेट देत सुट्या पैशांची व्यवस्था करण्याची विनंती केली. यावेळी सर्व बँकांनी व्यापारी संघटनेला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सुट्या पैशांची उपलब्धता करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सिंधुदुर्ग बँक आणि एचडीएफसी बँक यांनी सुट्या पैशांची व्यवस्था लवकर करण्यात येईल, अशी हमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. तालुका व्यापारी संघटनेला सर्व बँकांकडून चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल व्यापारी संघटनेतर्फे बँकांचे आभार व्यक्त करण्यात आले.









